OPTION TRADING INFORMATION IN MARATHI | ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?

            BEGINNING OF OPTION TRADING | ऑप्शन ट्रेडिंग ची सुरवात 

भाग -1

 ऑप्शन ट्रेडिंग ओळख | INTRODUCE OPTION TRADING 

               शेअर मार्केट ट्रेडिंग मधील एक महत्वाचा प्रकार म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग . कमी गुंतवणूक आणि कमी अनुभव असणाऱ्या लोकांसाठी हा एक आवडता ट्रेडिंग प्रकार आहे. जसे यामध्ये खूप जास्त पैसे कमावले जाऊ शकतात, तसेच गमावले ही जातात. हा प्रकार समजायला जेवढं सोपा दिसतो, त्यापेक्षा समजायला  खूपच किचकट आहे बर का ! आणि वर ऑप्शन ट्रेडिंग ची सुरुवात जरी कळाली तरी आपण या ऑप्शन प्रकारात पारंगत झालो हा भास ट्रेडर च्या मनात तयार करण्यात हा ऑप्शन प्रकार भलतच पटाईत !! मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो की, ऑप्शन ट्रेडिंग समजून तर घ्यायचे आहे परंतु मराठी मध्ये याची माहिती जास्त उपलब्ध नाही. यासाठीच आपण शेअर मार्केटमधील सर्वात चंचल प्रकार नफा नुकसान आणि समजण्यात ही अशा ऑप्शन विषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत. एक-दोन लेखात मावण्या सारखा या ऑप्शन भाऊंचा आवाका नाही बर का ?  म्हणूनच ऑप्शन म्हणजे काय ? इथपासून तर ऑप्शन ट्रेडिंग  स्ट्रॅटेजी,  त्याचबरोबर ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काय ? ऑप्शन चैन म्हणजे काय ? या सर्वांचा समावेश आपण दहा ते बारा लेखांमधे  करणार आहोत. याचा दुसरा फायदा असा की प्रत्येक लेखानंतर तुम्हाला चालू मार्केटमध्ये त्याची पडताळणी करून पाहता येईल. या प्रवासात आपण अगदी बेसिक ऑप्शन इन्फॉर्मेशन ते ऍडव्हान्स ऑप्शन स्टेटस पाहणार आहोत. एक प्रश्न आहे ऑप्शन मध्ये कॉल (CE) किंवा पुट ( PE )साठी जो शॉर्टफॉर्म वापरला जातो, त्याचा फुल फॉर्म काय आहे ? हे माहिती असेल तर नोट करून ठेवा नसेल तर तर याचे उत्तर खाली दिलेले आहे. हे सर्व समजुन घ्यायचा अगोदर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न जाणून घ्यावे लागतील म्हणजे ऑप्शन चा हा सर्व प्रवास समजायला सोपा जाईल.

Introduction of option trading
ओळख ऑप्शनची



ऑप्शन म्हणजे काय ? | WHAT IS OPTION ?

             अगदी सरळ सोप्या भाषेत ऑप्शनची व्याख्या म्हणजे हा एक असा करार आहे जो ट्रेडरला विशिष्ट स्क्रिप्ट ( स्टॉक किंवा इंडेक्स ) एका ठराविक किंमतीला खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा अधिकार देतो. ...... हुश्श ... वकील किंवा सरकारी भाषा समजणारे असतील त्यांनाच हे समजले असेल. आता सोप्या भाषेत समजून घेऊ त्यासाठी एक उदाहरण देत आहे ते लक्षात ठेवा इथून पुढे जेव्हा गरज पडेल तेव्हा याचा संदर्भ आपण घेणार आहोत.

रुपेश एका बांधकाम सुरु असलेल्या  राधेय अपार्टमेंटमध्ये सदनिका खरेदी करण्यासाठी गेला आणि 50 लाख रुपये सदनिकेची किंमत आहे. दोन महिन्यानंतर बांधकाम पूर्ण होईल आत्ताच सदनिका राखून ठेवण्यासाठी (बुकिंग ) रुपेश ने 1 लाख रुपये टोकण अमाऊंट दिली. आणि दोन महिन्यानंतर सदनिका खरेदी करण्याचा करार केला. हा एक पूर्ण ऑप्शन करार झाला. यामध्ये रुपेश हा ऑप्शन बायर ( option buyer ) खरेदीदार,  राधेय अपार्टमेंट हे ऑप्शन विक्रेता ( option seller) सदनिका ही एक स्क्रिप्ट ( derivative) आणि एक लाख रुपये हे झाले ऑप्शन प्रीमियम ( option premium) आणि दोन महिने ही झाली एक्सपायरी ( expiry)  या सर्व गोष्टी चा अर्थ आपण पुढे समजून घेऊ. आता या उदाहरणात काय होऊ शकते ते पाहू.

  • स्थिती 1: दोन महिन्यानंतर रुपेश ने 50 लाख देऊन सदनिका खरेदी केली. रुपेशला प्रीमियम च्या एक लाखाचे नुकसान झाले.

  • स्थिती 2:  काही कारणास्तव सदनिकेचे किंमत 20 लाख झाली रुपेश 50 लाखाची सदनिका घेण्यापेक्षा एक लाखाचा प्रीमियम देऊन सदनिका खरेदी करणे टाळले.

  • स्थिती 3 :  काही कारणास्तव सदनिकेची किंमत 80 लाख रुपये झाले. रुपेश ने 50 लाखात सदनिका खरेदी केली. त्याला 30 लाख रुपये फायदा झाला.

सर्वसाधारणपणे असा ऑप्शन चा व्यवहार असतो यातील टेक्निकल गोष्टींचा आढावा आपण पुढे घेऊच.

ऑप्शन ट्रेडिंग चा वापर कशासाठी | USE OF OPTION TRADING 

                       ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे अगदी कमी वेळात खूप जास्त पैसा कमवणे हाच समज खूप लोकांमध्ये प्रचलित आहे. त्यामुळे ऑप्शन मधील कामकाज हे कशासाठी सुरुवात झालते हे समजून घेण्याचा प्रयत्न खूप जण करतच नाही. तर ऑप्शन ट्रेडिंग चे दोन महत्त्वाचे वापर आपण जाणून घेऊया.

ऑप्शन ट्रेडिंगचा प्राथमिक वापर : हेजिंग | OPTIONS  PRIMARY USE : HEDGING 

                      सर्वात अगोदर ऑप्शन  सुरू करण्यामागचा उद्देश हा हेजिंग होता, परंतु नंतर लक्षात आले की, ऑप्शन ट्रेडिंग द्वारे कमी कालावधीची ट्रेडिंग | शार्ट टर्म ट्रेडिंग  करून चांगला पैसा कमावला जाऊ शकतो. म्हणून ऑप्शन मधे  रेगुलर ट्रेडिंग सुरू झाली.

 हेजिंग म्हणजे काय? | WHAT IS HEDGING?

               दीर्घकालीन पोर्टफोलिओ मध्ये असणारे शेअर्स जर काही कारणास्तव खाली येतील अशी शक्यता असेल तर काही थोडे प्रीमियम देऊन त्या शेअरचा ऑप्शन खरेदी करून नुकसान कमी करणे होय. उदाहरणार्थ तेजस जवळ 2600 रुपये किमत असणारे रिलायन्सचे 250 शेअर्स आहेत. जर या शेअरची किंमत दोनशे रुपयाने कमी झाली तर त्याला पन्नास हजाराचे नुकसान होईल. हे कमी करण्यासाठी तेजस ने 50 रुपये किंमत असणारा 2600 चा पुट खरेदी केला.

  •  आता जर रिलायन्स ची किंमत 200 रुपयाने कमी झाली तर तेजसला होणारे नुकसान हे बारा हजार पाचशे रुपये असेल. ( शेअर्स नुकसान 250 ×200 = 50000 - पुट मधील नफा ( 200 -प्रिमीयम 50 ) × 250 = 37500) 
  •  जर रिलायन्स 200 रुपयाने वरती गेला तर होणारा फायदा असेल 37500 एवढाच असेल. म्हणजे 12500  रुपये प्रीमियम देऊन तेजसने आपले दीर्घकालीन गुंतवणुकीचे एक प्रकारे इन्शुरन्स घेतला. या सर्व प्रकाराला हेजिंग असे म्हणतात. आणि हो लगेच असे काही करायला जाऊ नका यामध्ये स्ट्राइक प्राईस,  लॉट साईज असे बरेच घटक आहे. जे आपण पुढे पाहणार आहोत हे फक्त बेसिक उदाहरण होते, बाकीचे घटक आपण पुढे क्रमाक्रमाने पाहणार आहोत. यासाठी काही टेक्निकल अनालिसिस समजणे गरजेचे असते.


ट्रेडिंग साठी ऑप्शन चा वापर | OPTION USE FOR TRADING 

              गुंतवणूक कमी असेल तर जास्त किमतीचे शेअर्स किंवा इंडेक्स मध्ये ट्रेड करणे शक्य होत नाही. याला एक पर्याय म्हणून ऑप्शन चा उपयोग ट्रेडिंग साठी केला जाऊ शकतो. अगदी कमी प्रीमियम देऊन मोठ्या किमतीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्याची संधी ऑप्शन मुळे मिळते. जसे आपले सुरुवातीच्या उदाहरणं 50 लाखाची सदनिका फक्त 100000 प्रीमियम देऊन बुक केली जाऊ शकते. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मधून एक्सपायरी च्या अगोदर बाहेर पडण्याची  सोय असते. त्यामुळे योग्य प्रॉफिट मिळाल्यानंतर ऑप्शन मधून बाहेर पडता येऊ शकते. या कारणामुळे ऑप्शन हा ट्रेडिंगसाठी चा एक चांगला पर्याय होऊ शकतो हा परंतु योग्य प्रॉफिट किती आणि कधी बाहेर पडले पाहिजे यासाठी फ्युचर अंड ऑप्शन  ट्रेडिंगचा योग्य अभ्यास करणे गरजेचा आहे.

वरील सर्व माहिती ही ऑप्शन खरेदी या दृष्टीने विचारात घेतलेली आहे. ऑप्शन सेलिंग साठीची  जोखीम आणि भांडवल हे काही प्रमाणात वेगळे असते गुंता कमी करण्यासाठी त्याविषयीची चर्चा ऑप्शन सेलिंग समजून घेताना होईल.

ऑप्शन ट्रेडिंग का ? | WHY OPTION TRADING ?

                    शेअर मार्केटमध्ये काम करत असताना जर आपण खरेदी  इक्विटी मध्येही करू शकतो , तसेच  फ्युचर (future) मध्येही करू शकतो .तर मग ऑप्शन ट्रेडिंगच का? जर या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर तुमच्याजवळ असेल तरच ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कामकाज करायला सुरुवात करा. इक्विटी ट्रेडिंग आणि फ्यूचर  ट्रेडिंग यापेक्षा ऑप्शन ट्रेडिंग का यासाठी खाली काही मुद्दे दिले आहेत ते समजुन घेवु.

  • कमी भांडवलासह मोठ्या मालमत्तेवर नियंत्रण | CONTROLLING A LARGE ASSET WITH SMALL AMOUNT OF CAPITAL 

             ऑप्शनच्या मदतीने ट्रेडर अगदी थोड्या भांडवलात ही जास्त रकमेच्या स्क्रिप्ट मध्ये ( स्टॉक इंडेक्स ) ट्रेड करू शकतात. तसेच यामध्ये खास करून ऑप्शन बायिंग  मध्ये ट्रेडर ला त्याची जोखीम माहिती असते. म्हणजे जरी खूप मोठ्या रकमेच्या स्क्रिप्ट वरती काम करत असला तरीही जास्तीत जास्त खरेदी साठीचे प्रिमीयम एवढेच काय ते नुकसान होऊ शकते हे माहिती असते. वरील रिलायन्सच्या उदाहरणात पाहायचे झाले तर जर रिलायन्सचे 250 शेअर्स इक्विटी मध्ये खरेदी करायचे असतील तर 6.50 लाख भांडवलाची गरज असेल. तसेच हे ट्रेडिंग फ्युचर मध्ये करायचे असेल तर वेगवेगळे मार्जिन पकडले तरी साधारणपणे 1 ते 1.5 लाखाच्या मध्ये रकमेची आवश्यकता असेल. परंतु तेच ऑप्शन मध्ये ट्रेड  करायचे म्हणले तर अगदी 2 ते 2.5 हजारापासून करू शकतो.

  • कमी कालावधीमध्ये नफा कमविणे | ABILITY TO GENERATE SHORT TERM PROFIT 

                एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर काही काळापर्यंत ठेवल्यानंतर एक चांगला नफा मिळू शकतो. परंतु ज्यांची गुंतवणूक कमी आहे आणि गुंतवणूक जास्त काळासाठी करू शकत नसतील. ते ऑप्शन मध्ये एक्सपायरी टू एक्सपायरी या वर काम करून जास्त नफा मिळवू शकतात.  याच कारणासाठी ऑप्शन ट्रेडिंग जास्त लोकप्रिय आहे यामध्ये महिन्याला किंवा काही दिवसांत नफा कमावता येऊ शकतो. इथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे हे फक्त ऑप्शन चे बेसिक समजण्यासाठी चा मुद्दा आहे यामध्ये खूप अभ्यासाची आणि अनुभवाची गरज असते.

  • दीर्घ गुंतवणुकीला संरक्षण | TO PROTECT LONG TERM INVESTMENT 

   विश्लेषण आपण हेजिंग समजून घेताना केलेले आहे.

  • योग्य आणि अभ्यासपुर्ण वापर केला तर नफा कमविण्याचे सक्षम साधन | POWERFULL MONEY MAKING TOOL WHEN USE PROPERLY 

               ऑप्शन ट्रेडिंग चा योग्य अभ्यास करून जर शिस्तशीर पद्धतीने ट्रेडिंग केले तर यामधून कमी भांडवलातही एक चांगला नफा कमावला जाऊ शकतो.

  •  ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या शैलीत योग्य बसण्याची क्षमता | VERSATILITY TO FIT ANY TRADING & INVESTMENT STYLE 

              अगदी कोणत्याही पद्धतीची ट्रेडिंग असो गुंतवणूक असो, तुम्ही तेजीचे ट्रेडर | bull trader असाल किंवा मंदीचे ट्रेडर | bear trader,  इंट्राडे ट्रेडिंग असो की स्विंग ट्रेडिंग या सर्वांमध्ये ऑप्शन ट्रेडिंग ची ऍडजेस्ट होण्याची क्षमता असते. ऑप्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटर्जी बनवून तेजीचे किंवा मंदीचे ट्रेड करता येऊ शकतात. ऑप्शन मध्ये स्प्रेड स्ट्रॅटर्जी | SPREAD OPTION STRATEGY, स्ट्रँगल  स्ट्रॅटर्जी | STRANGLE OPTION STRATEGY स्ट्रडल  ऑप्शन स्ट्रॅटेजी | STRADLE OPTION STRATEGY तसेच इतरही काही स्ट्रॅटेजी बनवल्या जाऊ शकतात. तसेच ऑप्शन आणि फ्युचर यांचीही एकत्रित मेळ घालून रिस्क समजून ट्रेड करता येऊ शकतो. पुढील काही लेखांच्यात या सर्व स्ट्रॅटेजी विषयी आपण सखोल माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी फक्त उल्लेख आहे.

  • ट्रेडिंग मधील विविधता | DIVERSIFICATION IN TRADING 

               ऑप्शन ट्रेडिंग मुळे मग स्टॉक मधील असो किंवा इंडेक्स  मधील ऑप्शन ट्रेडिंग असो.  यामुळे प्रत्येक ट्रेडरच्या ट्रेडिंग ला विविधता येते.
     हे सर्व ऑप्शन ट्रेडिंग प्रचलित होण्याचे आणि लोकप्रिय होण्याचे काही मुख्य फायदे किंवा कारणे आहेत. ही सर्व झाली ऑप्शनची ओळख आता त्यामधील मुख्य घटक आणि ट्रेड विषयी माहिती घेऊ.
 

ऑप्शन ट्रेडिंग  मधील महत्त्वाचे घटक कोणते ? | IMPORTANT FACTOR IN OPTION TRADING 

  1. कॉल ( CALL) | CE - CALL EUROPEAN STYLE 
  2. पुट  ( PUT ) | PE - PUT EUROPEAN STYLE 
  3. एक्सपायरी | EXPIRY 
  4. स्ट्राईक प्राईज | STRIKE PRICE 
  5. लॉट साईज | LOT SIZE 

हे ऑप्शन मध्ये ट्रेड करण्यासाठीचे महत्त्वाचे पाच  घटक आहेत जे आपण समजून घेऊ.

कॉल ( CALL) | CE - CALL EUROPEAN STYLE  :

        ट्रेडर च्या भाषेत याला सीई |CE किंवा कॉल असे म्हणतात. तसेच लॉन्ग करणे हाही एक कॉलचा प्रकार आहे. याचा अर्थ एखादा स्टॉक किंवा इंडेक्स आहे त्या किमती पासून तेजी दाखवून, वरती जाईल असा अंदाज व्यक्त करून करार करणे होय. म्हणजेच हा एक तेजीचा सूचक आहे कॉल खरेदी करणे म्हणजे तेजीची पोझिशन बनविणे.

पुट  ( PUT ) | PE - PUT EUROPEAN STYLE  :

            यालाच पीई |PE  किंवा पुट असे म्हणतात. शॉर्ट करणे हे पुटला समानार्थी असल्यासारखे आहे. याचा अर्थ एखादा स्टॉक किंवा इंडेक्स आहे त्या किमती पासून मंदी दर्शवून खाली जाईल असा अंदाज व्यक्त करून करार करणे होय. म्हणजेच हा एक मंदीचा सूचक आहे पुट खरेदी करणे म्हणजे मंदीची पोझिशन बनवणे होय. एक गोष्ट समजून घ्या तेजी आणि मंदी या दोन्हींसाठीही ऑप्शन मध्ये खरेदीच केली गेलेली असते. 

                CE /PE - युरोपियन स्टाईल म्हणजे ज्याप्रमाणे युरोपमधील ऑप्शन कामकाज करतात. त्याच प्रमाणे भारतीय मार्केटमधील ऑप्शनही कामकाज करतील असा अर्थ होतो. ऑप्शन चा दुसरा प्रकार म्हणजे अमेरिकन स्टाइल ऑप्शन होय.

एक्सपायरी | EXPIRY :

            एक्सपायरी म्हणजे ऑप्शन मध्ये बनवलेला करार कधी संपणार याची निश्चित केलेली वेळ असते. अशीच एक्सपायरी फ्युचर ट्रेडिंग मध्येही असते. भारतीय मार्केट मध्ये ऑप्शनच्या करारा मधून एक्सपायरी च्या अगोदरही बाहेर पडता येते. परंतु एक्सपायरी नंतर नाही म्हणजेच एक्सपायरीला करार पूर्ण करणे बंधन कारक असते. आणि जे करार पूर्ण केले जात नाही ते अवैद्य होऊन जातात. हा यामध्ये इन द मनी असणारे ऑप्शन बाहेर पडणे बंधनकारक असते आणि त्यांनी जर करार पूर्ण केला नाही तर फिजिकल सेटलमेंट होते हे इन द मनी आणि फिजिकल सेटलमेंट काय प्रकरण आहे. ते आपण येणाऱ्या लेखांच्यात पाहणार आहोत इथे जास्त गोंधळ नको. आताही एक्सपायरी असते तरी कधी ? तर स्टॉकसाठी एक्सपायरी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असते. आणि गुरुवारी सुट्टी असेल तर त्या अगोदरचा दिवस म्हणजेच बुधवारी असते. याला मंथली एक्सपायरी असे म्हणतात. तर इंडेक्सची एक्सपायरी ही प्रत्येक गुरुवारी असते, याला विकली एक्सपायरी सिरीज असे म्हणतात. इंडेक्स मध्ये मंथली आणि विकली असे दोन्ही सीरिजमध्ये ट्रेड होतात.

स्ट्राईक प्राईज | STRIKE PRICE :       

                                   ऑप्शन मध्ये एखादा स्टॉक किंवा इंडेक्स वरती किंवा खाली जाईल फक्त एवढा अंदाज लावून पुरेसे होत नाही. तर तो कोणत्या किमती पर्यंत जाऊ शकतो, हे ठरवावे लागते आणि ती किंमत म्हणजे स्ट्राईक प्राईज होय. जर त्या किंमतीपर्यंत तुमच्या दिशेने वाटचाल झाली तर तुम्हाला नफा व्हायला सुरुवात होते.
 

लॉट साइज | LOT SIZE

                                  ऑप्शन मध्ये काम करताना ही गोष्ट लक्षात ठेवून लागते की फ्यूचर ट्रेडिंग आणि ऑप्शन मध्ये ट्रेडिंग हे लॉट साइज मध्येच करावी लागते. आता लॉट साइज म्हणजे काय ? तर एखाद्या कंपनीचे  ठराविक शेअर | number of share खरेदी करावे लागतात. इक्विटी मध्ये ट्रेडिंग करतो त्याप्रमाणे 1-2 शेअर खरेदी करता येत नाहीत. लॉट साइज ही एक्सचेंज ठरवतात त्यामध्ये वेळोवेळी बदलही केला जातो. साधारण  पणे सहा ते आठ लाख किमतीचा एक लॉट असतो आणि खरेदी ही लॉट साइज च्या प्रमाणातच करावी लागते. उदाहरणार्थ आयटीसी (ITC) या शेअरची  किंमत 220 एवढी आहे . त्याची लॉट साइज 3200 आहे.  म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन मध्ये आयटीसी चे 3200... 6400 ....9600 या प्रमाणात शेअर खरेदी करावे लागतील.

ऑप्शन मध्ये ट्रेड कसा करतात ? | HOW TO TRADE IN OPTION 


          वरती माहिती दिल्याप्रमाणे पुट आणि कॉल मिळून मुख्यतः ऑप्शन मध्ये चार प्रकारे ट्रेड केला जाऊ शकतो. कॉल आणि पुट या दोन्हींमध्ये ही वेगवेगळ्या प्रकारे तेजी आणि मंदी ची पोझिशन बनवली जाऊ शकते.
  1. कॉल खरेदी  | CALL BUY करून तेजीचा ट्रेड करणे.
  2. कॉल विकून | CALL SELL करुन मंदीचा ट्रेड करणे.
  3. पुट खरेदी  | PUT BUY करून मंदीचा ट्रेड करणे.
  4. पुट विकून | PUT SELL करुन तेजीचा ट्रेड करणे.

यामध्ये ऑप्शन खरेदी| OPTION BUYING आणि ऑप्शन विक्री | OPTION SELLING यासाठी कमी-जास्त भांडवलाची गरज असते.

 ऑप्शन मधील पुढील वाटचाल :


   या लेखामध्ये एवढेच पुढे आपण ऑप्शन बायिंग म्हणजे काय ? ऑप्शन सेलिंग म्हणजे काय ?  ऑप्शन ग्रीक्स | OPTION GREEKS म्हणजे काय ? आणि त्यांचा ऑप्शनच्या किमतीवर कसा परिणाम होतो. याविषयी माहिती पाहू तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा येणाऱ्या लेखांमध्ये नक्कीच त्यांच्यावर माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही आमच्या telegram channel ला जॉईन करु शकता. त्याबरोबरच youtube ला subscribe करु शकता.


48 टिप्पण्या

  1. खूप छान माहिती दिलीत आपण...
    आपले अभिनंदन व माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद...
    आपला हा उपक्रम कौतुकास्पद आहे..💐🙏💐

    उत्तर द्याहटवा
  2. स्ट्राईक प्राइज कशी निवडावी
    आणि टेक्निकल अॅनालिसीस कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा
  3. खुपच छान माहिती आणि योग्य शब्द्गप्रयोग अमोल सर...

    उत्तर द्याहटवा
  4. सोप्या पध्दतीने छान माहिती दिली आहे

    उत्तर द्याहटवा
  5. खुप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे परंतु एखाद्या विशिष्ट शेअरचे उदाहरण म्हणून समजावून सांगितले असते तर अजून स्पष्ट पणे समजले असते

    उत्तर द्याहटवा
  6. फार छान पद्धतीने विविध संज्ञा आणि त्यांची कार्यपद्धती यांचे विश्लेषण केले आहे. नवख्या माणसाला समजेल अशा प्रकारे लिखाण केले असून शेअर बाजारात कार्यरत नसलेल्या लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. मराठी माणसांसाठी खुप छान प्रयत्न आहे सर तुमचा..
    यानंतर अशाच पद्धतीने आपण मार्गदर्शन कराल ही अपेक्षा...
    आपल्या अभ्यासाचा फायदा प्रत्येक मराठी माणसाला होत आहे आणि होणार आहे...
    तुमचे खूप खूप धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो नक्कीच.... मराठी मधे माहिती उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असेल. फक्त मराठी माणसाने पण माहिती मराठी मधे शोधल्यास अम्हाला लिहण्यास प्रोत्साहन मिळते.

      हटवा
  8. खूप छान माहिती दिली आहे...
    मराठी माणसाला यांचा नक्की फायदा होईल.
    आपल्या मुळे मराठी माणूस शेअर बाजार शिकत आहे...आपणास व आपल्या समूहाला मनापासून धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर खूप छान माहिती दिली आहे
      मला माहीत नव्हते ?CE/PE म्हणजे काय पण आता मला माहीत झाले धन्यवाद सर
      तुमचा आभारी आहोत 👌👌🙏🏽🙏🏽

      हटवा
  9. माझ्या सारख्या नवशिक्या व्यक्तीला आपले लेखन उपयुक्त आहे. हे वाचून आपण सुद्धा या मार्गाने यश मिळवू शकतो असे वाटते. छान लेखाबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  10. खूप छान .. अतिशय सोप्या भाषेत मांडणी

    उत्तर द्याहटवा
  11. खूप छान माहिती आहे .पुढील लेखाची आतुरतेने प्रतीक्षा करतो....

    उत्तर द्याहटवा
  12. छान माहिती, समजायला।खूप सोप्या भाषेत सांगितलं आहे.

    उत्तर द्याहटवा
  13. Khup chan mahiti dili Sir. Share market madhe navin asnyarni survat kashi karavi tyabaddal ak lekh liha sir.

    उत्तर द्याहटवा
  14. साहेब आहेत ते लेख पण..... काही विशिष्ट विषयावर माहिती हवी असल्यास comment करा..

    उत्तर द्याहटवा
  15. खूपच सुंदर लिखाण...... cryptocurrency खरेदी वर माहिती दिली तर बरे होईल...

    उत्तर द्याहटवा
  16. सर आपण दिलेली माहीती आम्हाला खूप उपयूक्त ठरत आहे. धन्यवाद सर

    उत्तर द्याहटवा
  17. छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. दोन तीन वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देता आली असती तर समजायला अजून सोपं गेलं असतं.

    उत्तर द्याहटवा
  18. सर तुमच्या टेलिग्राम चॅनेल ची व व्हॉट स् अॅपची लिंक द्या प्लीज

    उत्तर द्याहटवा
  19. समजण्यास सोपी अशी माहिती .योग्य प्रकारे पटवून दिली.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने