INTRADAY TRADING IN SHARE MARKET | शेअर मार्केट मधील इंट्राडे ट्रेडिंग | बेसिक इंट्राडे ट्रेडिंग | BASIC OF INTRADAY TRADING
कोरोना मुळे झालेल्या लॉकडाउन नंतर खूप लोकांनी शेअर मार्केटमध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु त्यातील बऱ्याच लोकांना ट्रेडिंग म्हणजे नक्की काय? याविषयी खूप कन्फ्युजन आहे. जर youtube किंवा गुगल ला जावुन इंट्राडे ट्रेडिंग शोधले तर हजोरो व्हिडिओ, माहिती येतील पण फक्त इंट्राडे मधून कमवा लाखो रुपये! अमुक अमुक स्टेटर्जी वापरून तुम्ही मलामाल होऊ शकता!! या प्रकारचे थंबनेल असलेले व्हिडिओ सापडतील परंतु साध्या सरळ भाषेत ट्रेडिंग म्हणजे नक्की काय? त्यामध्ये कोणते प्रकार असतात? याविषयीची बेसिक माहिती अगदीच नगण्य आहे. त्याला कारणही झटपट पैसा कमावणे या उद्देशाने शेअर मार्केटमध्ये प्रवेश केलेली जनता हे आहे. आणि मराठीत तर त्याहूनही दुष्काळ आहे. एकदा शेअर मार्केट विषयीची माहिती मराठीतून शोधून पहा किती माहिती मिळते समजून येईल. म्हणूनच शेअर मार्केटमधील ट्रेडिंग म्हणजे नक्की काय ? त्याचे किती प्रकार असतात ? आणि नवीन लोकांनी तसेच अनुभवी लोकांनीही कोणत्या प्रकारातील ट्रेडिंग केले पाहिजे याविषयीच्या सर्व बाबींचा सकारात्मक तसेच नकारात्मक गोष्टींचा ऊहापोह आपण या लेखमालेत मध्ये करणार आहोत.
शेअर ट्रेडिंग म्हणजे काय? |WHAT IS SHARE TRADING ?
ट्रेडिंग याचा सरळसरळ अर्थ हा खरेदी विक्री करणे, म्हणजे व्यापार करणे असा होतो. शेअर मार्केट मधील ट्रेडिंग म्हणजे एन एस ई | NSE ( NATIONAL STOCK EXCHANGE )आणि बी एस ई | BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिस्टेड असलेल्या कंपनीच्या शेअर्स मधील खरेदी आणि विक्री करणे म्हणजे शेअर ट्रेडिंग होय. सुरुवातीला हे ट्रेडिंग फिजिकल म्हणजेच शेअर्सचे लिखित कागदपत्रची देवाण-घेवाण होऊन हे ट्रेडिंग केले जायचे. त्यासाठी एक्सचेंज कडुन मान्यताप्राप्त दलाल ( ब्रोकर) असत. परंतु आता व्यवहार हा ऑनलाइन डिमॅट च्या माध्यमातून केला जातो. यासाठी डिमॅट अकाउंट ची गरज पडते ज्यामध्ये तुमचे शेअर्स ठेवले जातात आणि त्यासाठी लागणारे पैसे हे ट्रेडिंग अकाउंट मध्ये असतात या विषयाची सविस्तर माहिती आपण अगोदरच्या लेखांमध्ये दिलेली आहे.
डिमॅट विषयी माहिती मराठी मधून याठिकाणी वाचू शकतात शकतात.
इथे 👉 डिमॅट अकाउंट
UPSTOX ओपन करून ट्रेडिंग सुरू करू शकता.
आपण या ठिकाणी ट्रेडिंग विषयी सविस्तर माहिती घेऊ
ट्रेडिंग चे प्रकार कोणते असतात ? TYPES OF TRADING
ट्रेडिंग मध्ये व्यवहार पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीनुसार काही प्रकार ठरवलेले असतात. यासाठी काही ठराविक कालावधीच किंवा विशिष्ट अशी व्याख्या नाही. मार्केटमध्ये काम करत असणाऱ्या सर्व ब्रोकर, एक्सचेंज आणि ट्रेडर्स या सर्वांत प्रचलित असणाऱ्या समजूती मधून या संकल्पना तयार झाल्या आहेत असे समजावे. काही संकल्पनांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फरक असू शकतो. व्यक्तिपरत्वे व्यवहाराच्या कालावधीमध्ये काही प्रमाणात फरक असू शकतो.
- इंट्राडे ट्रेडिंग | INTRADAY TRADING
- स्काल्प ट्रेडिंग |SCALPING
- स्विंग ट्रेडिंग | SWING TRADING
- पोझिशनल ट्रेडिंग |POSITIONAL TRADING
- इन्वेस्टमेंट |INVESTMENT
आजच्या लेखात मध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग आणि स्काल्पिंग ट्रेडिंग विषयी माहिती घेणार आहोत. बाकीच्या ट्रेडिंग प्रकारा विषयी टप्प्याटप्प्याने माहिती येईल.
ट्रेडिंग समजून घेण्यासाठी ज्या महत्त्वांच्या दोन घटकांची माहिती आवश्यक आहे, ते हे दोन घटक म्हणजे
फंडामेंटल अनालिसिस आणि
टेक्निकल अनालिसिस हे दोन्ही घटक समजले तरच ट्रेडिंग म्हणजे काय? आणि त्यामधील बारकावे समजून येतील.
इंट्राडे ट्रेडिंग |INTRADAY TRADING
इंट्राडे या इंग्रजी शब्दाचा शब्दश: अर्थ एका दिवसाच्या आत असा होतो. म्हणजे एक दिवसात खरेदी आणि विक्री हे दोन्हीही व्यवहार पूर्ण केले जातात अशा ट्रेडिंगला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. यावरून लक्षात आले असेल की सकाळी 9.15 ते दुपारी 3.30 या वेळामध्ये व्यवहार पूर्ण करायचा असतो नफा असो किंवा नुकसान असो तो दुसऱ्या दिवसा वरती ढकलता येत नाही. उदाहरणार्थ सकाळी 9.15 नंतर टीसीएस | TCS या कंपनीचे 100 शेअर्स ₹3200 या किमती मध्ये खरेदी केले असल्यास 3.30 च्या अगोदर जर त्यांची किंमत 3210 असेल तर तुम्ही त्यामध्ये ₹100 नफा घेऊन ते शेअर विकून व्यवहार पूर्ण करू शकता. जर या उलट 3.30 पर्यंत त्या शेअरची किंमत ₹3200 पेक्षा कमी असेल तरीही तुम्हाला ते नुकसानी मध्ये विकून व्यवहार पूर्ण करावा लागतो याठिकाणी 3.30 ही वेळ मार्केट बंद होण्याची दिलेली आहे. परंतु व्यवहार पुर्ण करण्यासाठीची शेवटची वेळ तुम्ही ज्या प्रकारचे डिमॅट अकाउंट वापरतात त्यानुसार बदलू शकते. आणि जर त्या वेळे अगोदर जर तुम्ही व्यवहार पुर्ण केला नाही तर तुमच्या वतीने ब्रोकर तुमचा व्यवहार पुर्ण करतो आणि त्यासाठी काही फी/दंड आकारला जातो. सकाळी मार्केट जरी 9.00 वाजता सुरू होत असले तरी PRE OPENING 9.08 मि ला होते परंतू त्यावेळी सामान्य ट्रेडर्स ला त्यामधे खरेदी विक्री करता येत नाही त्यासाठी 9.15 मि नंतरच ट्रेड करु शकता.
इंट्राडे मध्ये कंपनीचे शेअर्स खरेदी विक्री करू शकता, तसेच फ्युचर किंवा ऑप्शन मध्येही ट्रेडिंग करू शकता. मग ते फ्युचर आणि ऑप्शन हे इंडेक्स चे असू शकतात किंवा स्टॉकचे ही असू शकतात. फ्युचर आणि ऑप्शन हे या ठिकाणी फक्त उल्लेखित करत आहे. जास्त गुंतागुंत होऊ नये म्हणून याविषयी नंतर सविस्तर माहिती दिली जाईल इंट्राडे ट्रेडिंग मधील फायदे आणि नुकसान याविषयी खालील माहिती लक्षात घ्या.
इंट्राडे ट्रेडिंग झेरोधा आणि अपस्टॉक मधे | INTRADAY TRADING IN ZERODHA AND UPSTOX
झेरोधा किंवा अपस्टॉक मध्ये ट्रेडिंग करत असताना इंट्राडे ट्रेडिंग साठी झेरोधामध्ये एमआयएस | MIS या पर्याया खाली खरेदी किंवा विक्रीची ऑर्डर लावायचे असते. तर अपस्टॉक मध्ये इंट्राडे | INTRADAY हाच पर्याय उपलब्ध असतो. झेरोधा किंवा अपस्टॉक मध्ये नवीन मार्जिन नियमामूळे सारखेच मार्जिन मिळते. सध्या ते पाचपट | 5x आहे. फ्यूचर किंवा ऑप्शन मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठीही अनुक्रमे एमआयएस आणि इन्ट्राडे पर्याय असतात. झेरोधा मध्ये स्क्वेअर ऑफ वेळ म्हणजे व्यवहार पूर्ण करण्याची शेवटची वेळ ही 3.15 असते. तर अपस्टॉक 3.10 असते. ही वेळ थोडाफार फरकाने बदलतही असते.
इंट्राडे ट्रेडिंग मधील फायदे | ADVANTAGES OF INTRADAY TRADING |PROS
- मार्जिन/ लिवरेज चा फायदा मिळतो | HIGH BENEFITS OF LEVERAGE/MARGIN
मार्जिन किंवा लिवरेज म्हणजे सरळ भाषेमध्ये उधारी याचाच अर्थ तुम्ही ज्या ब्रोकर चे डिमॅट अकाउंट घेतले आहे, ते तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या रकमेच्या काही पट रक्कम उधारीवर देतात. ते ब्रोकर नुसार 05 ते 40 पट या प्रमाणात बदलत असते आपण समजण्यासाठी 20 पट लिवरेज घेऊयात. म्हणजे जर तुमच्याकडे ₹10000 असतील, तर तुम्ही ₹200000 चे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता. ऑप्शन आणि फ्युचर मध्ये हेच लिवरेज चार पट किंवा त्यापेक्षा जास्त ही असू शकते. वरती दिलेल्या टीसीएसचे | TCS उदाहरणांमध्ये जर तुम्हाला 100 शेअर्स खरेदी करायचे असतील तर ₹320000 एवढी रक्कम हवी आहे. परंतु इंट्राडे मध्ये तेच शेअर्स तुम्ही फक्त ₹16000 मधे खरेदी करू शकता.
2. शॉर्ट सेलींग करू शकता | SHORT SELLING
ही संकल्पना थोडी गुंतागुंतीची आहे. शॉर्ट सेलींग म्हणजे काय? तर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स अगोदर विकणे आणि त्या शेअरची किंमत कमी झाल्यानंतर पुन्हा खरेदी करून परत करणे होय. यामध्ये खरेदी किंमत मधून विक्री किंमत कमी केल्या नंतर जेवढे पॉइंट भेटतात तो तुमचा नफा असतो.याउलट जर शेअर ची किंमत वाढली तर नुकसान होते. यामध्ये बर्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की जे शेअर्स माझ्याकडे नाहीत ते मी अगोदर कसे विकले? तर त्याचे उत्तर असे आहे की तुम्ही ज्या वेळेस इंट्राडे मध्ये शेअर्स सेल करता / विकता त्यावेळेस तुमचा ब्रोकर तुमच्यासाठी ते शेअर्स खरेदी करून तुम्हाला उधारीवरती देत असतो आणि जेव्हा तुम्ही ते शेअर्स पुन्हा खरेदी करून ब्रोकरला परत करता तेव्हा तो व्यवहार पूर्ण होतो.
यामध्येही अजून बरेच काही घटक असतात परंतु आज आपण इंट्राडे ट्रेडिंग विषयी चर्चा करत आहोत त्यामुळे ते परत कधीतरी
शॉर्ट सेलींग ही सोय फक्त इंट्राडे ट्रेडिंग मध्येच उपलब्ध आहे. कारण यामध्ये जास्तीत जास्त नफा किती होणार हे माहीत असते परंतु नुकसान हे कितीही होऊ शकते. ऑप्शन किंवा फ्युचर सेलिंग हे मंथली एक्सपायरी पर्यंत असू शकते.
3. जास्त नफा | HIGH PROFITABILITY
इंट्राडे ट्रेडिंग कडे नवीन ट्रेडर्स आकर्षित होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जास्त नफा हे आहे. अतिशय कमी भांडवलामध्ये खूप मोठी उलाढाल करण्याची संधी लिवरेज मुळे प्राप्त होते आणि जर तुम्ही बरोबर असाल तर तुमच्या भांडवलाच्या प्रमाणात खूप जास्त नफा कमवला जाऊ शकतो. परंतु यासाठी योग्य अनुभव आणि कौशल्य असणे गरजेचे आहे. जर ट्रेड बरोबर आला नाही तर नुकसानही जास्त होण्याची शक्यता असते. यासाठी स्टॉप लॉस नावाचे शस्त्र आहे याचा योग्य वापर करणाऱ्यास कमीत कमी नुकसान होते.
4.ओव्हर नाइट बातम्या किंवा घटनांपासून संरक्षण |
मार्केट बंद झाल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी सुरु होण्या अगोदर घडणाऱ्या घटनांमुळे मार्केटमध्ये होणाऱ्या गॅप अप किंवा गॅप डाउन सुरवाती पासून संरक्षण मिळते. आज घेतलेले कोणतेही शेअर्स किंवा फ्युचर ऑप्शन्स हे आजच नफा किंवा नुकसान घेऊन व्यवहार पूर्ण केला जात असल्यामुळे मार्केट बंद झाल्यानंतरच्या राजकीय किंवा आर्थिक घटनांचा शेअर मार्केट वर परिणाम झाला तरी आपल्याला त्याचे काहीही नुकसान होत नाही. परंतु सकारात्मक बदलाच्या फायदयालाही यामुळे मुकावे लागते.
5. सकाळी 9.15 ते दुपारी 3.30 कामाची वेळ | 9.15am to 3.30 pm FIXED WORKING HOUR
. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून ठेवला जात नसल्यामुळे नोकरी प्रमाणे रोजच्या रोज सकाळी 9 ते दुपारी 3.30 पर्यंतचा वेळ देऊन उरलेला वेळ इतर कामासाठी किंवा कुटुंबासाठी देऊ शकता.हा मुद्दा काहीसा वादातीत आहे, कारण इंट्राडे ट्रेडिंग हे जरी या वेळात होत असले तरी त्यासाठीची पूर्वतयारी ही मार्केट सुरू होण्याअगोदर करून ठेवावी लागत असते.
इंट्राडे ट्रेडिंग मधील तोटे | DISADVANTAGES OF INTRADAY TRADING |CONS
- तणाव पूर्ण ट्रेडिंग | INTRADAY IS STRESSFUL TRADING
व्यवहार एकाच दिवसात पूर्ण करायचा असतो मग त्या व्यवहारात नफा असो किंवा नुकसान असो. त्यामुळे असे ट्रेडिंग करणे हे खूप तणाव निर्माण करणारे असते. तसेच यामध्ये ज्याप्रमाणे मोठे प्रॉफिट होण्याचे शक्यता असते तसेच मोठे नुकसान ही होऊ शकते. मानवी भावनांचा म्हणजेच भीती आणि लालच याचा खूप परिणाम इंट्राडे ट्रेडिंग मधील नफा किंवा नुकसान वरती दिसून येऊ शकतो. कधी कधी अनालिसिस बरोबर असुनही ऐनवेळी आलेली एखादी बातमी मुळे स्टॉप लॉस जावुन नुकसान होण्याची शक्यता इंट्राडे ट्रेडिंग मधे असते.
2. टेक्निकल अनालिसिस च्या कौशल्याची गरज |REQUIRED EPERTIES IN TECHNICAL ANALYSIS
टेक्निकल अनालिसिस मधील कौशल्याची खूप गरज इंट्राडे ट्रेडिंग साठी लागते. यामधीलच चार्ट मधील सर्व नाही तरी महत्त्वाचे कॅण्डल स्टिक पॅटर्न विषयी चांगले ज्ञान असण्याची गरज असते. त्याबरोबरच
टेक्निकल इंडिकेटर्स जसे की RSI ,
MACD आणि इंट्राडे मधील सध्या खुप वापारत असलेले SUPERTREND आणि V-WAP या विषयीही माहिती असायला हवी. इंट्राडे ट्रेडिंग साठी चार्ट वरील योग्य टाईम फ्रेम ची निवड करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी योग्य ज्ञान आणि शेअर मार्केटमधील अनुभव असणे गरजेचे आहे. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये नफा कमवायचा असेल तर शेअर्समध्ये होणारी मुव्हमेंट ही तुमच्या बाजूने आणि त्याच दिवशी झाली पाहिजे. त्यासाठी टेक्निकल अनालिसिस मध्ये हातखंडा असणे हाच पर्याय आहे. याबरोबरच विविध चार्ट पॅटर्न जसे की
फ्लॅग चार्ट पॅटर्न | FLAG CHART PATTERN , कप अँड हँडल चार्ट पॅटर्न | CUP AND HANDLE CHART PATTERN आणि त्यांचे ब्रेक आऊट ओळखता आले पाहिजे. त्यानुसार टारगेट आणि स्टॉप लॉस ठरवुन त्यानुसार कामकाजही करावे लागते.
3. जास्त स्क्रीन टाईम | HIGH SCREEN TIME
इंट्राडे ट्रेडिंग करायचे म्हणजे मार्केट सुरू असताना पूर्णवेळ मार्केटचे निरीक्षण करणे गरजेचे असते. त्यानुसार कोणत्या स्टॉक मध्ये ब्रेक आउट आहे किंवा ब्रेकडाऊन आहे हे समजून त्या दिशेने आपली पोझिशन घेता आली पाहिजे. तसेच चालू मार्केटमध्ये एखाद्या कंपनीच्या मध्ये काही घडामोडी घडत असेल तर त्यावरती नजर ठेवावी लागते एखादी राजकीय किंवा आर्थिक घटना मार्केटच्या कालावधीमध्ये घडत असेल तर त्याचा योग्य अर्थ लावून त्याप्रमाणे ट्रेड करावा लागतो. म्हणून या सर्व गोष्टी समजण्यासाठी पूर्णवेळ स्क्रीन समोर बसून राहावे लागते. मोबाईल किंवा लैपटॉप च्या स्क्रीन वर सतत लक्ष ठेवून चार्टचा अभ्यास करावा लगतो.
स्काल्पिंग | SCALPING
हाही एक इंट्राडे ट्रेडिंग चाच प्रकार आहे. परंतु इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जसे काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत या कालावधीसाठी मार्केटमध्ये पोझिशन घेतली जाते,त्याचप्रमाणे मार्केटमध्ये फक्त काही मिनिटांसाठी खुप जास्त मोठा ट्रेड घेतला जातो आणि नफा किंवा नुकसान घेऊन व्यवहार पूर्ण केला जातो यालाच स्कलपिंग असे म्हणतात. यामधे थोड्या थोड्या पॉइंट साठी अनेक वेळा ट्रेड केला जातो. या प्रकारचे ट्रेडिंग मार्केट मधे अतिशय हालचाल | VOLATILITY असणाऱ्या वेळेत केले जाते. जसे की सकाळी 9.15 ला मार्केट सुरू होते त्यावेळेस मार्केटमध्ये खूप हालचाल असते त्यावेळेस खूप जास्त कॉन्टिटी खरेदी किंवा विक्री करून स्कलपिंग केले जाते. तसेच काही इवेंट असेल, महत्वाची घटना असेल त्यावेळेस स्कलपिंग केले जाते.
इंट्राडे ट्रेडिंगचे जे फायदे आणि तोटे आहेत तेच स्काल्पिंग चेही असतात. या स्काल्पिंग ट्रेडिंग मध्ये अतिशय जलद ट्रेडिंग करण्याचे तसेच निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. तसेच टेक्निकल अनालिसिस मध्ये पारंगत असणारा व्यक्तीच स्कलपिंग मध्ये यशस्वी होऊ शकतो.खुप कमी वेळात यामधे खुप जास्त नफा किंवा नुकसान होऊ शकते. त्यामूळे अनुभवा नंतरच या स्काल्पिंग नामक प्रकारात हात घातलेला बरा नाहीतर हात जळण्यची शक्यताच जास्त!!!
महत्वाचे काही:
या लेखाचा उद्देश फक्त इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय याविषयी बेसिक माहिती हा होता. त्यामुळे टेक्निकल बाबींवरती यामध्ये चर्चा केलेली नाही. जसे की इंट्राडे ट्रेडिंग साठी कोणते इंडिकेटर फायदेशीर आहेत किंवा इंट्राडे ट्रेडिंग साठी कोणत्या टाईम फ्रेमच्या चार्ट वरती अभ्यास केला पाहिजे. स्टॉप लॉस आणि टारगेट कसे निश्चित करावेत. रिस्क रिवार्ड रेशो इंट्राडे ट्रेडिंग मध्ये कशा पद्धतीने वापरावा. इत्यादी गोष्टी जास्त गुंतागुंत होऊ नये म्हणून येथे टाळण्यात आलेल्या आहेत. यामधील बऱ्याच मुद्द्यांचे अगोदरच्या काही लेखांमध्ये आपण विश्लेषण केलेले आहे. ते तुम्ही वाचून माहिती घेऊ शकता आणि जे घटक राहिलेले आहेत त्यावरती आपण माझे मार्केट च्या माध्यमातून लवकरच माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.
Best article on intrday..
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏🙏
हटवा